वाघाची मावशी
वाघाची मावशी
वाघाची मावशी, वाघाची मावशी असं सारखं सारखं
आपणास म्हणून आपला अपमान कां केला जातो असा प्रश्न मांजरीला पडला. ही मांजर राहायची मुंबइतल्या एका मोठ्या सदनिकेत.
तिची मालकीनबाई तिचा फार लाड करायची. लाडानं तिला टिटू म्हणायची.
आपली टिटू ही इतरांच्या घरी असलेल्या
मांजरींपेक्षा अधिक स्मार्ट आणि हुषार व्हावी असं त्यांना वाटायचं. त्यामुळे त्या टिटूला
जगातल्या सगळया गोष्टी सांगत. टिटूसुध्दा त्यावर मान डोलवायची. याचा अर्थ तिला
सारं काही कळतं असं मालकीनबाईंना वाटायचं. आपली ही स्मार्ट टिटू डॅशिंग व्हावी. कुणालाही
भिऊ नये अशी त्यांची इच्छा होती.. त्यामुळे त्यांनी तिला स्वरक्षणाच्या आणि
इतरांवर आक्रमण करण्याच्या काही गोष्टी शिकवायचा प्रयत्न केला. या प्रकारानं टिटू
कंटाळली. त्यामुळे तिने पळून जाण्याचाही विचार केला. पण पळून गेल्यावर आपणास असं
छान छान गुबगुबित अंथरुणावर झोपायला मिळणार नाही. खायचेप्यायचे लाड होणार नाहीत. मालिकीनबाईच्या
गाडीतून फिरायला मिळणार नाही. नटायला मिळणार नाही. सजायला मिळणार नाही हे तिच्या
लक्षात आलं. त्यामुळे तिने पळून जाण्याचा बेत बदलला.
मालकीनबाई जे काही प्रशिक्षण देत असे ते तिने फार
कष्टानं घेतलं. आपण जे शिकवतो ते टिटूला आवडतय अशी समजूत करुन घेऊन, वा, फारच्च
छान, असं म्हणून मालकीनबाईनं तिचा गालगुच्चा घेतला.
या प्रशिक्षणाचा काही उपयोग होतो का हे
बघण्यासाठी त्यांनी एके दिवशी घरात लुडबूड करणाऱ्या उंदराचा पाठलाग करण्यास टिटूला
सांगितलं. पण उबदार अंथरुणात झोपण्याची व सतत काही ना काही खाण्याची सवय लागलेल्या
टिटूला एका धावेतच दम लागला. तोपर्यंत तो उंदिर घरातून नाहिसा झाला होता.
मालिकबाईनं यावर तिला काहीच म्हंटल नाही की त्या
रागवल्याही नाही. पण टिटूचा हिरमोड झाला. मालकीनबाई देत असलेला शुध्द सात्विक आहार
खाऊनखाऊन कंटाळलेल्या टिटूला काहीतरी वेगळी चरमरित आणि चमचमित मेजवाणी हवी होती. उंदराच्या
रुपानं तिच्यासमोर अशी मस्त मेजवाणी आली होती. पण ही मेजवाणी हातातोंडा देखत निघून
गेली, याचं तिला दु:ख झालं. ती बराच वेळ उदास होऊन बसली. तिच्या या उदासीचं कारण
मालकीनबाईंच्या लक्षात आलं.
त्या तिला म्हणाल्या, तुझ्यापेक्षा तो उंदिर
अधिक स्मार्ट निघाला. मी शिकवलेल्या युक्त्या तुला वापरताच आल्या नाहीत. मी तुला
हुषार समजत होते. पण तू तर मठ्ठच निघालीस. हा मठ्ठपणा सोडला नाहीस तर तुला
घराबाहेर हाकलून लावीन, बरं का. मी शिकवलेल्या गोष्टींचा सराव करत जा. फक्त खादाडून
झोपू नकोस.
मालकीनबाईंनी दिलेली धमकी टिटूच्या लक्षात आली. आपण
हातपाय हलवले नाहीतर आपली काही खैर नाही हेही तिच्या लक्षात आलं. पण हातपाय
हलवायचं म्हणजे काय करायचं, हे काही तिच्या लक्षात येईना. असे हातपाय हलवण्याचा तिने
प्रयत्न केला तर ती एकदा कोचावरुन खाली पडली. थोडक्यात तिचं डोकं वाचलं. नकोच ते
हातपाय हलवणं म्हणून तिने मग मालकीनबाईनं सांगितलेल्या स्ट्राँग होण्याच्या गोष्टींचा
सराव करण्याचं सोडून दिलं. जेव्हा वेळ येईल तेव्हाचं तेव्हा बघू, असं स्वत:ला
समजावत मग ती खा - प्या आणि झोपा काढा यात पुन्हा रमून गेली.
०००
एकदा टिटू मालकीनबाईंसोबत बाहेर जायला निघाली. गाडीत
बसणार तोच शेजारच्यांचा कुत्रा टिटूवर भुंकू लागला. त्या भुंकण्यानं ती जाम
घाबरली. थरथर कापायला लागली. तिची ती अवस्था बघून मालकीनबाईस हसू येतं होतं आणि
रागही येत होता. आपण हिला स्ट्रांग होण्यासाठी खाऊ पिऊ घालतो. तिला स्वसंरक्षणाचे
प्रशिक्षण देतो तरी ही मठ्ठोबासारखीच वागते. असं त्या स्वत:शीच पुटपुटल्या. खरंतर
त्यावेळेस मालकीनबाईला टिटूचा राग आला होता. पण त्यांना बाहेर जाणं फारच गरजेचं
असल्यानं त्या टिटूला काहीच बोलल्या नाहीत. त्या माघारी फिरल्या आणि टिटूला घरात
सोडून तिच्याकडे जराही न बघता त्या निघून गेल्या.
मालकीनबाई आपल्यावर जास्तच रागवल्या असल्याचं टिटूच्या
लक्षात आलं. आता काय करावं बरं ? पळून जावं का ? पण पळून जाणार कुठं ? तो कुत्रेटला आहेच ना वाटेत आपली मान
मुरगाळायला. त्याला कसं चुकवणार ? आपली ही झोपण्याची
मऊ मऊ गादी कशी नेणार ? छे,छे पळून जायचं नाही. मालकीनबाई आली की
रडवलेल्या चेहऱ्यानं त्यांच्याकडे बघायचं. त्यांना मग आपली दया येऊन त्या क्षमा
करतील, असं टिटूनं स्वत:ला समजावलं. पुढचं पुढं बघू, असं स्वत:शी बोलत तिने तिच्या
अंथरुणावर ताणून दिली.
दोनचार तासानंतर मालकीनबाई जेव्हा घरी परतल्या
तेव्हा टिटू गाढ झोपेतच होती. मालकीनबाईनं तिला उठवलं. झोपेमुळे ती ताजीतवाणी झाली
होती. त्यामुळे तिला चेहरा काही रडवलेला करता येईना. तिने तसं करण्याचा प्रयत्न
केला तर ते विदुषकी चाळे वाटू लागले. हे बघून मालकीनबाई खुद्कन हसल्या. त्या
हसल्या की सारं काही छान होउुन जातं, हे एव्हाना टिटूला ठाऊक झालं होतं. त्यामुळे
तिच्या डोक्यावरचा ताण निवळला. ती मालकीनबाईंच्या कुशित शिरली.
मालकीनबाई तिला कुरवाळत म्हणाल्या, अगं, तू
इतकी स्मार्ट असताना त्या उंदराला पकडू शकत नाहीस, तू तर वाघोबाची मावशी. वाघोबाला
सारेच भितात. तू मात्र त्या किरकोळ कुत्र्याला भितेस..बरं दिसतं का तुला. हे जर
त्या वाघोबास कळलं तर त्याला किती बरं वाईट वाटेल.
कोण हा वाघोबा, हा प्रश्न टिटूला पडला. पण हा
प्रश्न विचारुन मालकीनबाईंचा राग ओढवायचा नाही. हे तिनं ठरवलं आणि मालकीनबाईंच्या
सांगण्याला होकार दिला.
तू, वाघोबाची मावशी असल्यानं यापुढे कुणालाही
घाबरायचं नाही बरं का टिटू. लाडात
येऊन मालकीनबाई म्हणाल्या. टिटूनं सुध्दा लाडात येऊन त्यांच्या गालाला आपला गाल
लावला..
०००
रात्र झाली. मालकीनबाई झोपी गेल्या. टिटूही
तिच्या मऊशार अंथरुणात जाऊन पडली. पण तिला काही झोप येईना. या कुशिवरुन त्या
कुशिवर ती वळू लागली. सारखा तिच्या डोक्यात वाघोबाचाच विचार येऊ लागला. वाघोबाची
आपण मावशी कशी ? हा कोण वाघोबा ? राहतो कुठे ? एवढ्या वर्षात आपल्याला कुत्रा दिसला, बोका
दिसला, उंदिर दिसला, मालकीनबाईच्या घरात काचेच्या भांड्यातील मासा दिसला. कासव
दिसला. मग वाघोबा कां दिसला नाही ? आपण जर वाघोबाची मावशी असू तर त्याची आई आपली बहीण
झाली. ती सुध्दा कधीच दिसली नाही. तिनं आपल्याला कधी बोलावलं सुध्दा नाही.. मालकीनबाई
वाघोबाच्या नावानं आपल्याला भीती दाखवत आहेत हो. वाघोबा बिघोबा कुणी नसणारच .. असं विचार करता करता मध्यरात्री टिटूला कधी झोप
लागली हे कळलं नाही.
गाढ झोपतेच तिच्याकडे कुणीतरी येताना दिसलं. तो
एक धिप्पाड प्राणी होता. तिच्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठा. डोळे आणि मिशा
तिच्यासारखेच दिसत होत्या. पायाची नखं थोडीफार तिच्यासारखीच होती. त्याला बघून टिटूला
दरदरून घाम फुटला. ती त त प प करायला लागली..
क क कोण रे तू, टिटू कशीबशी बोलली..
हे काय गं मावशे, मला नाही ओळखलं तू...
म्हणजे तू रे कोण आणि मी तुझी मावशी कधीपासून
झाली. मला तर कुणी बहीण होती असं काहीच आठवत सुध्दा नाही.
काय गं मावशे, तू इथे या मोठ्या घरी येऊन बसलीस. मऊ
मऊ गादीवर झोपतेस ,चॉकलेट खाते. पिझ्झा खाते. टीव्ही बघते. मालकीनबाईच्या गोष्टी
ऐकतेस. तेव्हा तुला तुझी बहीण आणि तुझे भाचरे कसे आठवणार ?
आँ.
आँ, काय करतेस मावशे तू. असं वागणं बरोबर नाही. तू
चल माझ्याबरोबर तुझ्या बहिणीकडे आणि भाच्यांच्या घरी..
आँ..
मावशे, हे सारखं सारखं आँ, आँ काय करतेस. मी खरच
सांगतो तुला. मी तुला न्यायलाच आलो आहे.
न्यायला म्हणजे ? कुठं जाणार ? कसं
जाणार ?
अगं, तू माझ्या पाठीवर बस मी बरोबर घेउुन जाईन
तुला माझ्या घरी.
तुझं सुध्दा घरं आहे.
मग माझं घरं असं चार भिंतीतलं नाही, तुझ्या घरासारखं. ते खूप मोठ्ठं आहे. राजाच आहे
मी माझ्या घराचा.
आँ..
पुन्हा आँ. मावशे. वाघाची मावशी सारखी आ, आँ करते याचा अर्थ ती फारच बावळट घाबरट आणि
मूर्ख आहे असा नाही का होत ? तुझ्या मालकीनबाईस हे कळलं तर त्या हाकलून नाही
का देणार तुला. तेव्हा त्यांनी असं काही करण्याआधी तू माझ्या सोबत चल... वाघोबा म्हणाला..
वाघाची मावशी, वाघाची मावशी, असं मालकीनबाई आपणास
म्हणते, तो हा वाघ आपल्यासमोर असा उभा ठाकेल असं टिटूस वाटलं नव्हतं. प्रारंभी
तिला त्या धिप्पाड वाघाची भीती वाटली. पण तो वाघ तिला सारखा-सारखा मावशे मावशे
म्हणू लागला तेव्हा तिची भीती थोडीफार पळून गेली. तिने वाघोबाच्या मिशीला स्पर्ष
करण्यासाठी एक पंजा पुढे केला. वाघोबास आपली मिशी प्राणापेक्षाही प्रिय असल्यानं
त्याला मावशीची ही कृती आवडली नाही. खरतर त्याला रागच आला. त्यामुळे त्याने
मावशीचा तो पंजा पकडण्यासाठी आपला जबडा उघडला. त्या उघडलेल्या जबड्यातील
सुळयासारखे दात आणि विजेसारखी लपलप करणारी जीभ बघून टिटू गर्भगळीत झाली. तिने
जोराने किंकाळी फोडली. झोपतेच उडी मारली. रात्रीच्या अंधारात ती सोफ्याला जाउुन
धडकली. तिच्या डोक्याला मार लागली. त्या वेदनेने टिटू विव्हळू लागली. या धडपडीच्या
आवाजामुळे मालकीनबाईंना जाग आली. त्या टिटूच्या खोलीत आल्या. त्यांनी लाईट लावला.
टिटूची ती अवस्था बघून त्यांना हसावं की रडावं हे कळेना. व्हिवळत असणाऱ्या टिटूला
त्यांनी उचललं. तिच्या डोक्यावरुन हात फिरवला. टिटूस बरं वाटलं.
काय झालं टिटू. वाघ दिसला की काय तुला स्वप्नात...
वाघाचं नाव कानावर पडताच टिटूने मान हलवली आणि मालकीनबाईच्या
कुशित आणखी घट्ट शिरली.
तिच्या अंगावरुन हात फिरवत मालकीनबाई म्हणाल्या, अगं
तू वाघोबाला बघितल्यावर घाबरलीस कशाला. तू तर त्याची मावशी ना.
टिटूने, नाही नाही अशा स्वरुपाची मान हलवली. वाघोबाचं नाव कानी पडताच टिटूला सू होता होता
राहिली. तिच्या अंगावरचे केस उभे राहिले. ती थरथर कापू लागली. हे बघून मालकीनबाईस
गम्मत वाटली. टिटूला वाघाची भीती वाटत असली पाहिजे असं त्यांना वाटलं.
होना गं.
टिटूने पुन्हा मान हलवली. भिंतीवर टांगलेल्या
वाघोबाच्या चित्राकडे बघून तिने मालकीनबाईच्या कुशित शिरण्याचा प्रयत्न केला.
अगं तू वाघाची मावशी असताना त्याला घाबरतेस कशी
गं. आँ. तू अशीच घाबरत राहिलीस तर मी तुला घरातून हाकलूनच लावीन. मालकीनबाईने तिला दटावून सांगितलं.
मालकीनबाई काहीही करु शकतात याची टिटूला खात्री असल्यानं,
आपण आता वाघोबास घाबरणार नाही, असं कसंबसं सांगण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तिने
उसनं अवसान आणलं. पण मालकीनबाई झोपायला गेल्यावर ते अवसान गळून पडलं.
०००
भिंतीवर टांगलेल्या वाघाच्या छायाचित्राकडे तिचं
लक्ष जाताच टिटू जागच्या जागी थरथरायला लागली. तिने स्वत:ला आक्रसून घेतले. तो
छायाचित्रातील वाघोबा मात्र बराच वेळ झाला तरी काहीच करत नाही असं तिच्या लक्षात
आल्यावर तिला हायसं वाटलं. तिनं स्वत:चं आक्रसणं सोडून दिलं. शरीरास आळोखेपिळोख
देऊन ती पूर्ववत झाली. भिंतीवरील वाघाच्या चित्राकडे काही क्षण एकटक बघत राहिली. चित्रातील
वाघाच्या डोळयात डोळे टाकून बघितले. पण तो चित्रातील वाघोबा हुं की चूं करेना...
आपण समजतो तितका हा वाघोबा काही भीतीदायक दिसत
नाही. उगाचच काहीबाही कल्पना करुन आपण घाबरत होतो. भीती आपल्या मनात असते. ती
काढून टाकली तर मग आपल्याला कुणीच काही करु शकत नाही. असं ती स्वत:लाच म्हणाली. तिने पुन्हा एकदा वाघोबाच्या
चित्राकडे बघितलं. तो एकाच जागी ढिम्म उभा होता. फारच ढिम्माडा दिसतो बाँ आपला
हा भाचा, असं स्वत:शीच पुटपुटत टिटू झोपी गेली.
०००
दुसऱ्या दिवशी मालकीनबाई उठल्या तरी टिटू काही
उठली नव्हती. मालकीनबाईंनी समोरच्या खोलित येऊन बघितलं तर काय, टिटू गाढ झोपेलेली
होती. मध्येच ती हसल्यासारखी करायची. ते बघून मालकीनबाईस गंमत वाटली. त्या
तिच्याजवळ बसल्या. टिटूने पुन्हा एकदा झोपत हसल्यासारखं केलं. टिटू नक्कीच स्वप्न
बघत असणार असं त्यांना वाटलं. तिची ती गम्मत थोडावेळ बघावी म्हणून त्या कोचावर
बसणार तोच त्यांचा हात लागून टिपॉयवरचा ग्लास पडला. त्या आवाजानं टिटू जागी झाली. समोर मालकीनबाई बघून ती
ओशाळली.
काय गं वाघाचे मावशे किती झोपतेस तू. दूध प्यायची
वेळ निघून गेली तरी तू उठली नाहीस. मालकीनबाई म्हणाल्या.
वाघाची मावशे हा शब्द कानावर पडल्यावर टिटूला
मज्जा वाटली. खूप भारीसुध्दा वाटलं. मालकीनबाईंच्या अंगावर उडी घेत त्यांना ती
बिलगली. त्यांचे गाल लाडाने चाटू लागली. मालकीनबाईनांही बरं वाटलं. काल रात्रीचा
भीतीचा लवशेषही टिटूच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता.
मग मावशे, जरा मॉर्निंग वॉक करुन यायचा का.. त्यांनी विचारलं. टिटूनं होकारार्थी मान हलवली.
मालकीनबाईंनी तिच्या गळयात पट्टा टाकला आणि त्या
खाली उतरु लागल्या. टिटूला बघताच शेजारच्यांचा कुत्रा भुंकू लागला. तो असा दिसला
आणि भुंकायला लागला की टिटू गर्भगळीतच व्हायची. मात्र आज काही तसं झालं नाही. टिटूने
उलट त्या कुत्र्याच्या नजरेला नजर भिडवली. कुत्र्यासाठी हे नवीनच होतं. तिचे ते
चकाकणाऱ्या डोळयांनी एकटक बघणं त्याला सहन होईना. त्याची मान खाली गेली. त्याच्या
भुंकण्याचा स्वर कमी झाला. कुई कुई असं तो कुंथत कुंथत आवाज काढू लागला.
कमालच केलीस टिटू तू. या डॉगीस केवळ नजरेनं
घाबरवलंस, वाव...मालकीनबाई तिच्याकडे
बघत म्हणाल्या.
असं काही घडेल हे टिटूनं अपेक्षित केलं नव्हतं. पण
काल रात्री वाघोबाकडे एकटक बघताना तिची भीती पळून गेली होती. आपण उगाचच कुणालाही
भितो याची जाण तिला तेव्हा झाली. एकदा मनातून भीती गेली मग मस्त आत्मविश्वास येतो.
हे काल तिला कळलं होतच. आज प्रत्यक्षात तसं घडलं...
तू गं बये खरोखरच वाघाची मावशी आहेस हं, मालकीनबाई म्हणाल्या आणि त्यांनी टिटूचा
गालगुच्चा घेतला.
सुरेश वांदिले
Comments
Post a Comment