सशाचा नकार


 

सशाचा नकार

कासवाच्या नव्या पिढीस पुन्हा एकदा सशासोबत धावण्याची स्पर्धा करण्याची उर्मी दाटून आली. नव्या पिढीतील पिंकू कासवानं त्याच्या बाबांना आपला इरादा सांगितला.

बाबांनी त्याला हरप्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला. की असल्या भाकड आव्हानांना काही अर्थ नसतो म्हणून.

मात्र पिंकूला काही ते पटलं नाही. तो बाबास म्हणाला,

बाबा काही झालं ना तरी विजय माझाच होणार, ससा कितीही वेगानं धावला ना तरी त्यास काही वेळानं कंटाळा येणार नि तो झोपी जाणार. हे पाच पिढीचं सत्य आताच्या पिढीत असत्य कसं ठरु शकतं.

आधी तसं घडलं म्हणून आताही तसच घडेल हा भ्रम ठेवणं धोक्याचं ठरतं. पिंकूचे बाबा त्याला समजावत  म्हणाले. पण पिंकू हट्टासच पेटला होता.

 बघ बाबा तुझं तूच. काळाप्रमाणे पिढी बदलत राहते. तशी आजची सशाची पिढी बदलली असेल तर तू तोंडघशी पडशील. पिंकूचे बाबा त्यास समजावत म्हणाले.

अहो बाबा, काही जण बदलूच शकत नाही तसचं या सशांचं आहे. त्यांचा आकार बदलला नाही, की त्यांचं गवत खाणं बदललं नाही. तेव्हा आपण त्यांना आव्हान दिलच पाहिजे. पुन्हा एकदा कासवच श्रेष्ठ असं सिध्द करुन दाखवलं पाहिजे.

अरे, पण त्याची गरज काय. असल्या बिनकामाच्या आव्हानांवर आपण आपली शक्ती कशाला खर्ची घालायची. बाबाने पिंकूला समजवण्याचा प्रयत्न केला. पण पिंकूस बाबांचं म्हणणं काही पटलं नाही. त्यास वाटलं बाबा आता म्हातारे झाले तसेच त्यांचे विचारही म्हातारे झाले .

त्याने बाबांचा सल्ला ऐकता टिंकू सशाला आव्हान दिल. त्यास वाटलं की आपल्या आवाहनामुळे टिंकूस राग येईल .तो झटपट स्पर्धेसाठी तयार होईल. पण, तसं काही झालं नाही. टिंकूला अजिबातच राग आला नाही.

तो म्हणाला,

पिंकू, आता स्पर्धाबिर्धा नको वाटते. स्पर्धा तुझ्यात आणि माझ्यात करुन काय उपयोग. तू धावू शकत नाही आणि मी हळू चालू शकत नाही. तेव्हा अशी असमान स्पर्धा कशाला करायची. आमच्या पूर्वजांनी ते केलं आणि ससा हरल्याचा ठपका आमच्या माथी लागला. त्या आमच्या पूर्वजानं केलेली चूक मी कां करावी. तुझ्याशी स्पर्धा करण्यापेक्षा मी दुसऱ्या जंगलातल्या सशाशी नाही का स्पर्धा करणार. तो श्रेष्ठ की मी श्रेष्ठ हे ठरेल ना त्यात. कधीतरी झालेली चूक मी पुन्हा कां बरं करायची? तू सुध्दा असल्या बकवास आव्हानांचा विचार करायला लागलास म्हणजे यार तू मागच्या काळात जगतोस की.

टिंकू असं बरच काही पिंकूस बोलला.

पिंकूस वाटलं ससा घाबरला.

म्हणजे, तू माझं आव्हान स्वीकारणार नाहीस तर, कासावनं पुन्हा एकदा विचारलं.

छे छे त्याऐवजी मी आताच तुला विजेतेपद देऊन टाकतो ना. तू जाऊन सांग तुझ्या मित्रांना, तू कसा मला हरवलस ते.

असं कसं शक्य आहे.

कां नाही, अरे मला आव्हान देणं जर तुला शक्य आहे तसं तू मला हरवलस हे तुझ्या मित्रांना सांगणं शक्य नाही का.

पिंकूला सशाचं म्हणणं काही कळलं नाही. तो तसाच या कथनाचा विचार करत बसला.

टिंकू मात्र आपला वेग कसा वाढेल याच्या सरावाला लागला.

सुरेश वांदिले

 

Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!