निस्वार्थी कोंबडोबा

 

निस्वार्थी कोंबडोबा

   वननगरीत सिंह महाराजांनी जाहीर केलं की जी मूलं नव वर्ष धुमधडाक्यात साजरं करतील, त्यांना ते त्यांना दक्षिण आफ्रिकेतील सफारीला पाठवतील. महाराजांची ही घोषणा अघटीत होती. अचंबित करणारी होती. ही घोषणा एैकून महाराणी चिंतित झाल्या.

   अहो, तुम्हाला झालं तरी काय? महाराणी म्हणाल्या.

   कुठे काय? महाराज उत्तरले.

   अहो,तुमच्या घोषणेबद्दल म्हणतेय मी.

   छान आहे ना..

   अहो, याआधी तुम्हाला असं काही आवडायचं नाही. आता सर्व मुलं नवं वर्ष साजरं करतील.या सर्वांना दक्षिण आफ्रिकेला पाठवायचं म्हणजे अर्ध राज्यच विकावं लागेल हो तुम्हाला. महाराणी चिंतेच्या स्वरात म्हणाल्या. यावर महाराज काहीच बोलले नाहीत.त्यांनी फक्त स्मित केलं.

   महाराजांची घोषणा एैकल्यानंतर, वननगरीच्या मुलांचा उत्साह वाऱ्यासारखा वाहू लागला. त्यांनी जंगी तयारी चालवली.31 डिसेंबर आलं नि जोरात साऱ्यांच नाच गाण, खाणं पिण, मस्त धम्माल झाली.प्रत्येकाला खात्रीच होती दक्षिण आफ्रिकेच्या जंगल सफारीमध्ये नंबर लागण्याची. मध्यरात्र उलटून गेल्यावरही धम्माल सुरुच राहिली.

मध्यरात्रीनंतर कधीतरी थकून सारी मूलं निद्रादेवीच्या स्वाधीन झाली. सूर्यदेवाचं आगमन झालं.तरी एकही मुलगा साखर झोपेतून उठलाच नाही. दुपारपर्यंत मंडळी आळस देत राहिली.

   00

   महाराज मात्र नवीन वर्षाच्या पहाटेच उठले.सकाळच्या सर्व विधी आटोपून त्यांनी वननगरीचा फेरफटका मारायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना दिसल की वननगरीची मुलं अजूनही झोपेतच आहेत. नवीन वर्षात आळसात लोळत पडली आहेत. फक्त एकच मुलगा उत्साहानं कामाला लागला होता. महाराजांना बरं वाटलं. त्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन महाराज महालात परतले.

   त्यांनी दुपारी वननगरीच्या स्टेडियममध्ये दरबार बोलावला. महाराज आता जंगल सफारीची तारीख जाहीर करतील असं सर्वांनाच वाटत होतं. मुलं आणि त्यांचे आईवडील खुषित होते.

   सभा सुरु होताच महाराजांनी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. जंगल सफारीची तारीख कधी जाहीर करतात,असं सर्वांना झालं होतं.

   महाराज म्हणाले,की त्यांनी जंगल सफारीसाठी एकाचीनिवड केली आहे.

   फक्त  एकच..मुलांनी एकच गलका केला.

   होय...

   पण आम्ही तर जोरात आणि जोमात नवीन वर्ष साजरं केलं....मुलं ओरडली.

   अजिबात नाही.तुम्ही नवीन वर्ष साजरच केलं नाही.तुम्ही जुनं वर्ष साजरं केलं. नि नव्या वर्षाचा प्रारंभ आळसानं केला.सूर्य देवाचं आगमन झालं तरी तुम्ही झोपेतच होता. फक्त कोंबडयाचा हा मुलगा पहाटे उठून त्याचं काम उत्साहानं करत होता. नव्या वर्षाचं हे खरं स्वागत. झोपून स्वागत करणारे आळशी. अशा आळशांना मी दक्षिण आफ्रिकेच्या सफारीला पाठवणार नाही.समजलं.

   सर्व मुलांना त्यांची चूक लक्षात आली.सर्वांनी महाराजांच्या समोर शपथ घेतली. यापुढे उगाच धांगडधिंगा करणार नाही. लवकर झोपू आणि लवकर उठू...कामाला लागू..व्यायाम करु..अभ्यास करु..

ही शपथ ऐकून महाराजांना अत्यानंद झाला. त्यांनी सर्व मुलांना सर्वांना शाबासकी दिली. पुढच्या वर्षी केनिया जंगलाची सफारी घडवण्याची घोषणा केली...त्याच बरोबर कोंबड्याची यंदाची जंगल सफरी पुढे ढकलण्याची घोषणा सर्वांसमोर केली.

ही घोषणा ऐकून सर्वांना धक्का बसला..महाराणी सर्वांदेखत म्हणाल्या...अहो ही फसवणूक झाली..असं तुम्ही करु शकत नाही..

महाराज फक्त हसले.तेव्हा महाराणींना आणखीनच राग आला. त्या जोरजाराने भांडू लागल्या. ते बघून कोंबडा व्यासपीठावर गेला आणि त्याने महाराणींना शांत केले.

अरे, पण तुला वाईट नाही का वाटले..महाराणींनी विचारलं.

नाही राणीसाहेब..उलट मला आनंदच झाला. अहो, मी माझ्या या सर्व मित्रांना एकटाच सोडून कसा काय दक्षिण आफ्रिकेत जाणार बरं..सोबत मित्र असतील तर तर खरी गंमत आणि मजा की नाही ..

महाराणी काहीच बोलल्या नाही. महाराजांनी पुन्हा एकदा स्मित केलं.

कोबंडा पुन्हा राणीसाहेबांना उद्देशून म्हणाला..

राणीसाहेब अहो, मी आता दक्षिण आफ्रिकेत गेलो तर पहाटे पहाटे आरवणार कोण? मग माझ्या मित्रांना जाग कशी येणार बरं..मग त्यांनी आता घेतलेल्या शपथेचं काय?म्हणजे शपथ मोडली म्हणून त्यांची केनिया सफारी सुध्दा रद्द नाही कां होणार?

महाराणींना कोंबड्यांच्या या सुज्ञपणाचे कौतुक वाटले. त्यांनी जोराने कोंबडोबाकी जय असा नारा दिला. या नाऱ्याने आख्खे स्टेडियम दणाणून गेले..

सुरेश वांदिले

 

   0000

 


Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!