सिरी आणि होमवर्क
सिरी आणि होमवर्क
बाबांनी घरी आणलेल्या सिरी यंत्रमानव ताईसोबत तेजोयमीची लगेच गट्टी झाली. सिरी
यंत्रमानव असली तरी तिला कृत्रिम बुध्दीमत्तेमची जोड देण्यात आली होती. म्हणजे
नेहमीच्या यंत्रमानवांपेक्षा वेगळी आणि स्वतंत्र विचार करण्याची क्षमता हळूहळू
प्राप्त करता यावी अशी तिची रचना करण्यात आली होती. याचा अर्थ काही दिवसांनी तिला
स्वतंत्र विचार करणं शक्य होतं. त्यामुळे सांगितलेल्या गोष्टींशिवाय स्वत:हून आणखी
इतर कामही करु शकणार होती.
सिरीनं हे तेजोमयीस स्वत: सांगितलं. तेजोमयीला
याचा आनंद झाला. तिने सिरीला मिठी मारली.
तुला एवढा आनंद होण्याचं काय कारण गं? सिरीने विचारलं.
अगं, तू जेव्हा स्वतंत्र विचार करु लागशील तेव्हा
माझा होमवर्क करु शकशील ना?
अगं, अभ्यासाची कामं अशी दुसऱ्यांकडून करुन
घ्यायची नसतात. ही वाईट सवय झाली.
तुला कसं माहीत ? तुला तर आमच्या मदतीसाठीच तयार करण्यात आलय ना. मग आम्ही जे सांगू ते तुला करायलाच पाहिजे. तेजोमयी
चढ्या आवाजात म्हणाली.
आम्हाला जे सांगितलं तेच करायचं हे खरं असलं तरी, तुमचं नुकसान होईन असं काहीही करायचं नाही, हे
सुध्दा आम्हाला सांगण्यात आलय बरं का मिस तेजोमयी.
अगं, होमवर्क केल्यानं काही माझं नुकसान-बिकसान
होणार नाही.
मग तुझ्या शिक्षकांनी कां बरं होमवर्क दिला तुला? तुझा अभ्यास पक्का व्हावा. तुझ्या संकल्पना स्पष्ट व्हाव्यात. तू स्वत:हून आणखी अभ्यास साहित्य वाचावं. उत्तर सोडवावित यासाठीच ना...सिरीनं विचारलं.
अगं बाई तुला आमच्या सरांनी सुपारी दिली की काय,
मला उपदेश करण्यासाठी. तुला जर माझा होमवर्क करायचा नसेल तर करु नको. मी आईकडून
करुन घेईल. तेजोमयी तिला अंगठा दाखवत म्हणाली.
हे मात्र मी अजिबात सहन करणार नाही हं. तुझा
होमवर्क आईनं कां करुन द्यायचा?
कारण ती माझी आई आहे. शत्रू नाही.
तुझा होमवर्क ती करुन देणार असेल तर ती तुझी शत्रूच ठरते. सिरी शांतपणे म्हणाली. याचा तेजोयमीला राग आला.
या दोघींचं बोलणं ऐकणाऱ्या आईसही याचा राग आला. कोण कुठली भटकभवानी सिरी-फिरी,
आपल्याला शत्रू म्हणते म्हणजे काय?
तुला मी चांगलाच इंगा दाखवते बघ आता, आई सिरीला रागावत म्हणाली
आईच्या वरच्या पट्टीतील आवाजाने दिवाणखान्यात ट्रान्सफॉर्मर
चित्रपट बघत असणाऱ्या बाबांना, काहीतरी अघटित घडणार, ते कळून चुकलं. ते लगेच आत
आले.
या सिरी-फिरीस आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढलं
नाही तर बघा.. बाबांकडे बघून आई
गर्जली.
बघा म्हणजे, तू काय करणार ? बाबांनी विचारलं.
अहो सर, या एकतर स्वत:चं डोकं दुखवणार नाही किंवा माझी
बॅटरी विझवून माझी वाट लावणार, सिरी
हसत म्हणाली.
भवाने तू उगाच शहाणपणा करु नकोस. आई चिडून म्हणाली
हे बघा मॅडम, एक तर मी भवाने नाही, मी सिरी आहे. सिरीला भवानी म्हणून तुम्ही तुमचा
गोंधळ करत आहात नि मलाही गोंधळात टाकताहात. असा खरोखरच गोंधळ उडाला तर ही
शहाणी-सुज्ञ-आज्ञाधारक सिरी, खरोखरच
भवानी बणेल. हाती त्रिशूळ घेऊन तुमच्या पाठीमागे लागेल. मग तुम्हाला पळता भूई थोडी
व्हायची. सिरी एका दमात
बोलून गेली.
बघा बाबा, बघा कशी बोलते पोपटासारखी...शोभतं का
हिला असं हे. तिला तुम्ही आपली
सर्व्हंट म्हणजे सेवेकरी म्हणून आणली ना. मग तिने तिची पायरी ओळखूनच नको का
वागायला नि बोलायला. तेजोमयी फणकाऱ्यानं
म्हणाली.
हा वाद संपणारा नाही हे बाबांच्या लक्षात आलं.
त्यांनी तिघींना शांत बसायला सांगितलं. या वादाचं मूळ कारण काय ते आईला विचारलं.
अहो, ही मला तेजोची शत्रू म्हणाली. रागाने सिरीकडे बघत आईनं उत्तर दिलं.
पण त्या आधी काहीतरी घडलं असेल ना.. त्याशिवाय
सिरीला वाटलं म्हणून ती काही तुला शत्रू ठरवणार नाही. तिच्या मेंदुतील गणित तिला
याची परवानगीच देणार नाही.
म्हणजे माझ्यावर तुमचा विश्वास नाही का? आई गुस्स्यात म्हणाली.
बाबांनी यावर काहीच उत्तर दिलं नाही. त्यांनी मग
आपला मोर्चा तेजोमयीकडे वळवला.
काय गं, आई म्हणते ते खरं असेल तर सिरी असं कां
म्हणाली, हे तू सांग ना..
अहो बाबा ही अशीच आहे आगलावी..तेजोमयी म्हणाली
अगं, हे काही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही.
पण ती आईला माझी शत्रू म्हणाली ना..
कां म्हणाली..ते सांग की...
माझा होमवर्क करण्यासाठी तिने नकार दिलाच शिवाय
आईला सुध्दा करु देणार नाही असा तिचा हेका आहे. तेजोमयी नजर खाली करुन म्हणाली..
अच्छा तर सारा घोटाळा होमवर्कने केला म्हणायचा...बाबा हसून उद्गारले.
याचा अर्थ तुम्हाला यात काहीच वावगं वाटत नाही का ? आईनं
विचारलं.
वावगं तर तुला वाटायला हवं. असा स्वत:चा अभ्यास दुसऱ्याकडून करुन घेणं हे
वाईटच नाही का.. तेजो, आज होमवर्क
करुन द्या म्हणाली. उद्या म्हणेल माझ्या ऐवजी शाळेत जा, परवा म्हणेल परीक्षेत माझा
पेपरही सोडवून ये. सिरीला जर असच म्हणायचं
असेल तर यात राग कां बरं यावा..
बाबांनी विचारलं..
आई आणि तेजोमयी यावर काहीच बोलल्या नाहीत. त्या
दोघींनाही आपली चूक उमगली असावी असं बाबांना वाटलं. त्यांनी तसं बोलूनही दाखवलं.
काय हो, बरोबर ना, बाबा आईकडे बघत म्हणाले. नाही तर पालथ्या
घड्यावर पाणी..
म्हणायचं तरी काय तुम्हाला? आई नाराजी दर्शवत म्हणाली.
अहो, तुम्ही परवाच तेजोमयीस सांगत होतात ना की,
उत्तम संस्कारांसाठी साने गुरुजींचं शामची आई पुस्तक वाचायला हवं म्हणून...ती माऊली शामला त्याची कामं त्यालाच
करायला सांगायची.
०००
सर, मला शामची आई पुस्तक वाचायला मिळेल कां हो, आतापर्यंत गप्प असलेल्या सिरीनं विचारलं.
तेव्हा आई खुदकन हसली. तिचा रागही पळाला.
आपल्या या प्रश्नावर मॅडम कां बरं हसल्या
असाव्यात, याचं गणित सध्या सिरी सोडवत आहे....
सुरेश वांदिले
०००
Comments
Post a Comment