सॉरी कंडक्टर काका
सॉरी कंडक्टर काका
बऱ्याच दिवसांनी परवा, तेजोमयी आईबाबांसमवेत सिटी
बसने ब्रांद्याला गेली होती. बस मध्ये तीन-चारच प्रवासी होते. त्यामुळे कंडक्टर(वाहक)काकांनी तिकिटे
दिल्यावर ते एका आजोबांच्या बाजूला येऊन
बस मधील लोखंडी खांब्यास रेलून उभे राहिले आणि त्यांनी आजोबांशी थेट गप्पा सुरु
केल्या. आजोबांनीही त्यांना प्रतिसाद दिला. तेजोमयी आणि आईबाबा त्या आजोबांच्या
मागेपुढेच बसले असल्याने त्यांना हे संभाषण चांगलं ऐकू येत होतं. त्या संभाषणात
खाजगी काहीच नव्हतं.
कंडक्टर काकांनी बोलता बोलता आजोबांना त्यांचं वय
विचारलं. त्यांनी वय सांगितलं तेव्हा कंडक्टर काका म्हणाले, विश्वासच बसत नाही हं
आजोबा..तुम्हाला कुणी म्हातारे म्हणेल काय बरं..आजोबा हसले.
काही क्षण शांततेत गेले. मग कंडक्टर काकाच बोलू
लागले,
अहो आजोबा, आपली तब्येत ना आपणच चांगली ठेऊ शकतो.
व्यवस्थित खानपिणं आणि शांत झोप हवी. सकाळी व्यायाम हवा. खरं तर आपण दररोजचं
वेळापत्रक तयार करायला हवं. त्यात प्रत्येक गोष्टीसाठी वेळ राखून ठेवला नि
त्याप्रमाणे वागलो ना की मग तब्येत एकदम ठाँ राहते...
कंडक्टर काकांचं असं संभाषण सुरु असताना, बाबा
त्याचं म्हणणं काळजीपूर्वक ऐकत होते. ते काकांच्या लक्षात आल्यावर, बरोबर ना
साहेब, असं अधूनमधून काका बाबांकडे बघून म्हणत. बाबाही होकारार्थी मान डोलवत.
याचं तेजोमयीस आश्चर्य वाटू लागलं. बाबांना
इतक्या साऱ्या गोष्टी ठाऊक असताना, ते कंडक्टर काकांचं सांगणं मन लावून ऐकताहेत हे
काही तिला रुचलं नाही..
थांबा येईपर्यंत बाबा कंडक्टर काकांचं सांगणं ऐकत
होते. बोलता बोलता त्यांनी आहारात पालेभाज्यांचं महत्व, फळांचं महत्व, तणाव
घेण्याचे तोटे, तणावामुळे शरीरात वाढणारी साखर, त्यामुळे निर्माण होणारा मधुमेह
असं बरचं काही सांगितलं. बाबांना याचं फार कौतुक वाटलं. थांब्यावर उतराना बांबांनी
कंडक्टर काकांची पाठ थोपटली. काकांनी हसून टाटा केला.
घरी आल्या-आल्या तेजोमयी बाबांना म्हणाली,
अहो बाबा, त्या सामान्य कंडक्टरचं सांगणं इतकं
काय मन लावून ऐकत होतात बॉ..
तेजोयमीचं हे बोलणं ऐकून आई तिला रागावलीच..
अगं सामान्य का? आदरार्थी
बोलना...असं कुणी सामान्य आणि कुणी लगेच असमान्य होत नाही..तुझे बाबासुध्दा एक
सामान्य अधिकारीच आहेत असं म्हंटलं तर..
तसं नाही आई पण...
काही असं आणि नि तसं नाही..आधी सॉरी म्हण आणि असं
कुणाचा एकेरी नावाने अनादर करणार नाही हे कबूल कर आधी..आई नाराजीच्या स्वरात
म्हणाली.
सॉरी आई..चुकलं माझ..यापुढे कुणाला असं ऐकरी
नावाने बोलणार नाही..पण माझ्या प्रश्नाचं उत्तर बाबांनी दिलं नाही ना..
त्यावर बाबा हसले. तिला आपल्या समोर उभे करुन म्हणाले..
अगं, मी त्या कंडक्टर काकांचं सांगणं काळजीपूर्वक
मन लावून ऐकलं तर त्यात तुला काय खटकलं..
अहो बाबा, कंडक्टर काकांना कुठे काय व्यवस्थित
माहिती राहू शकते तुमच्यासारखी..तुम्ही किती शिकलात, त्यांचं शिक्षण किती... तेजोमयी
म्हणाली. ते एकून बाबांना वाईट वाटलं. तेजोमयीच्या मनात काहीतरी भ्रम असल्याचं
त्यांच्या लक्षात आलं. ते तिला जवळ घेत म्हणाले..
अगं बाळ..कुणाचं किती शिक्षण यावर त्याच्या
ज्ञानाची गुणवत्ता जोखणं बरोबर नाही. ते कंडक्टर काका माझ्यापेक्षा कमी शिकले
असतील कदाचित पण त्यांना आपलं दैनंदिन जीवन आनंदी आणि निरोग ठेवायची किती छान माहिती
होती..शिवाय त्यांच्याकडचं हे ज्ञान ते मनापासून देत होते. त्यामध्ये आपल्याला
काहीतरी भव्यदिव्य ठाऊकाय याची फुशारकी नव्हती..तेव्हा अशा व्यक्तिंना आपण दाद
दिली, त्यांचं कौतुक केलं तर काहीच बिघडत नाही..
पण बाबा..
अगं आता पण कशाला....तुझ्या मनात हा थोर तो लहान,
तो मोठा, तो ज्ञानी असे ठोकताळे आहेत ना..ते बदलून टाक आता..माणूस त्याच्या
गुणांनी ओळखला पाहिजे..त्याच्या पदाने किंवा श्रीमंतीने किंवा रुपाने नाही बरं
का..आई तेजोमयीस समजावत म्हणाली..
आई- बाबा दोघेही इतक्या पोटतिडकिने सांगताहेत
याचा अर्थ आपलं खरच चुकलं याची खात्री तेजोमयीस पटली..तिच्या नकळत तिच्या मुखातून,
सॉरी कंडक्टर काका निघून गेलं...
सुरेश वांदिले
Comments
Post a Comment