आकाशात पोहचलेली दुर्गा
आकाशात पोहचलेली दुर्गा
तिच्या आई-बाबांचा अजिबात विश्वास बसत नव्हता. त्या बातमीवर. कसा
बसणार? त्यांच्या १५ वर्षीय कन्येला असा काही अफलातून
सन्मान मिळू शकतो,
असं त्या दोघांनी कल्पनाही केली नव्हती. मात्र जगात काहीच अशक्य नाही हे वचन सत्य
असल्याची त्यांची खात्री, आपल्या मुलीला मिळालेल्या सन्मानामुळे झाली.
या दोघांच्या कन्येचा शब्दकोशात अशक्य हा शब्दच
नाही. खेळणं-बागडणं-टीव्हीत रममाण होणं, यातच आंनदाचा ठेवा बघणाऱ्या मुलांच्या
वयोगटातील या मुलीस मात्र आनंद मिळत होता, पाण्याच्या अभ्यासात.
या अभ्यासाचं वेड तिला लहानपणीच लागलं. पृथ्वीचा
७० टक्के भाग पाण्याने व्यापला असला तरी जगात पाण्याचा अभाव ही फार मोठी समस्या
असल्याचं तिच्या लक्षात लहान वयातच आलं होतं. जिथे पाऊस धो धो पडतो त्या
भारतासारख्या देशातसुध्दा पाण्यासाठी लोकांना वणवण करावी लागते. शेतीसाठी पुरेसं
पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान होतं. पिण्याच्या पाण्यासाठी
रांगा लावाव्या लागतात. मोठया बायांसोबतच छोट्या मुलींना पाण्यासाठी कित्येक मैल
चालावं लागतं.
रात्रंदिवस सुरु असलेल्या पाण्याच्या अभ्यासातून
या मुलीस हे सगळं कळत होतं आणि त्यामुळे तीचं मन दु:खी कष्टी होत होतं. पाणी
साठवून ठेवण्यासाठी काहीतरी करायला हवं, असं तिला तेव्हापासूनच वाटायला लागलं.
तेव्हा ती फक्त ११ वर्षाची होती.
तिचं लहान वय तिच्या प्रयत्नाच्या आड आलं
नाही.उलट या वयात असणाऱ्या बालसुलभ उत्साहामुळे ती अधिकच जोमाने यावर काम करु लागली.
जिथे पाऊसच कमी पडतो, त्या ठिकाणी पाणी साठवणार तरी किती? जर पाणी साठवता येत नसेल तर ते वाचवणार कसं? हे प्रश्न या मुलीस पडले. पाणी वाचवण्यासाठी
पाण्याचा पुर्नवापर करायला हवा असं तिला वाटू लागलं.
पाण्याचा वापर हा तीन पध्दतीनं केला जातो. पहिला
प्रकार पिण्याचा पाण्याचा. यास व्हाईट वाटर असं संबोधलं जातं. कपडे धुणे आणि
आंघोळीसाठी वापरलं जाणारं पाणी दुसऱ्या प्रकारात येतं. त्यास ग्रे वाटर असं
संबोधलं जातं. आणि तिसरा प्रकार म्हणजे शौचालये आणि स्वच्छतागृहात वापरण्यासाठी.
ते ब्लॅक वाटर नावानं ओळखलं जातं.
या तीन्ही प्रकारापैकी फक्त ग्रे वाटर म्हणजेच
कपडे धुणे आणि आंघोळीसाठी वापरात येणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर शक्य असल्याचं
तिच्या लक्षात आलं.
तिला हायसं वाटलं. पण या विषयात जेव्हा ती खोलवर
शिरली तेव्हा तिच्या लक्षात आलं की आंघोळीसाठी आणि कपडे धुण्यासाठी आपण जो साबण वापरतो, त्यात घातक रसायने असतात.
त्यामुळे हे पाणी शेतीत किंवा बागेतील झाडांना देता येणार नाही. कारण या
रसायनांमुळे शेत जमिनीच्या सुपिकेतवर आणि पिकांवरही दुष्परिणाम होऊ शकतो.
मनुष्यप्राण्याच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होऊ शकतो.
याचा अर्थ पाण्याचा पुनर्वापर शक्यच नाही का? तिला प्रश्न पडला. काही काळ ती निराशही झाली. पण
ही निराशा तिने फार काळ टिकू दिली नाही. पाण्याच्या अभ्यासात तिने आणखी खोल उडी
मारली.तेव्हा तिला रिठा या वनस्पतीची माहिती मिळाली.
भारतात फार पूर्वीपासून रिठा वनस्पती
स्वच्छतेसाठी वापरतात. या रिठ्याचा आणि तो स्वच्छतेसाठी वापरल्यावर निर्माण
होणाऱ्या ग्रे वॉटरच्या अभ्यासात तिने स्वत:ला आकंठ बुडवून टाकलं. चार वर्षे ती
याच एका विषयावर अभ्यास-संशोधन-निरीक्षण करत होती. १०० हून अधिक झाडांवर तिनं
परीक्षण केलं. घरातील एक मोठया बेडरुमचं तिने यासाठी प्रयोगशाळेत रुपांतर केलं.
चार वर्षात मिळालेल्या माहितीचं विश्लेषण
करण्यासाठी संख्याशास्त्राचा अभ्यास सुरु केला.
मातितील पोषक तत्वे आणि आरोग्यावर परिणाम
करणाऱ्या सूक्ष्म जीवांचा तिने सखोल अभ्यास केला. चार वर्षाच्या अथक परीश्रमानंतर
तिने आपलं संशोधन जाहीर केलं. रिठ्याचा वापर केललं पाणी झाडांसाठी आणि
स्वच्छतागृहाची स्वच्छता करण्यासाठी
सुरक्षित असल्याचं तिने जाहीर केलं.
या अफलातून संशोधनाने थोरामोठ्यांना तोंडात बोटे
घालायला भाग पाडलं. तिचं संशोधन
पाण्याच्या पुनर्वापरासाठी खूप उपयुक्त असल्याचं या थोरामोठ्यांनी मान्य केलं. एका
सर्वसाधारण घरात वर्षभरात अशा प्रकारे मिळणाऱ्या ७३ हजार गॅलन ग्रे वाटरचा वापर
झाडे,बागा यासाठी करता येऊ शकतं हे दिसून आलं.
तिचा उत्साह व्दीगुणित झाला. पाण्याच्या
पुनर्वापरासाठी जाणीवजागृती करण्यासाठी तिने ग्रे वाटर प्रोजेक्ट अशी कंपीनच
उघडली. त्यामार्फत पाण्याच्या पुनर्वापारासाठी आवश्यक असणारी यंत्रणा कशी
उभारायची, यासाठी ती मार्गदर्शन करु लागली. रिठ्यावर आधारित, ग्रे वाटर जलसंवर्धन
विषयावर तिने प्राथमिक वर्गातील मुले आणि शिक्षकांसाठी अभ्यासक्रम तयार केला. अनेक
शाळांनी हा अभ्यासक्रम स्वीकारला. ती स्वत: शाळा, ग्रंथालये,मोठ्या कंपन्यांच्या
कार्यक्रमात या विषयी कार्यशाळा घेते.
रिठ्याच्या बियांपासून निर्माण झालेल्या पाण्याचा
पुनर्वापर करण्याच्या तिच्या अफलातून संशोधानाची दखल चिल्ड्रन्स क्लायमेट प्राईज,
हा पुरस्कार देणाऱ्या समितिने घेतली. गुगल सायन्स फेअर स्पर्धेत ती पहिल्या २०
मध्ये होती. इंटरनॅशनल सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग फेअर या जागतिक स्पर्धेत तिच्या
संशोधनाला तिसरा क्रमांक मिळाला. कॅलिफोर्निया लाइफ सायन्स इंस्टिट्यूटने आायोजित
बे एरिआ बायोजीनियस चँलेज स्पर्धेत तिला पहिला क्रमांक मिळाला..
हे सारं काही स्वप्नवत असलं तरी त्यापाठिमागे
होतं प्रचंड परीश्रम आणि धेय्याचा न थकता केलेला पाठलाग...तिच्या या पाठलागानेच
तिला, त्या अफलातून सन्मानापर्यंत पोहचवलं होतं..
०००
जागतिक स्तरावर सतत पहिला क्रमांक मिळवणाऱ्या
अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शैक्षणिक संस्थेतील लिंकन
प्रयोगशाळेनं दोन लघुग्रह शोधून काढले. अशा लघुग्रहांना पृथ्वीवरील एखाद्या
गुणंवतांचं नाव दिलं जातं.
लहान वयातच आपल्या संशोधनानं सर्वांचं लक्ष वेधून
घेणाऱ्या तिच्या कर्तृत्वाकडे लिंकन प्रयोगशाळेचं लक्ष न जात तर ते नवलं ठरलं
असतं. या प्रयोगशाळेनं शोधलेल्या एका लघुग्रहाचं नामकरण, ३३१८८ श्रेया (रामचंद्रन) असं केलं.. हाच तो
सन्मान ज्याची कल्पनाही तिच्या आईबाबांनी केली नव्हती..
सुरेश वांदिले
९३२४९७३९४७
Comments
Post a Comment