मैत्र जिवांचे
मैत्र जिवांचे
दोन दिवसापासून अलेक्झांडर (द डॉगी)
अस्वस्थ होता. सकाळी उठल्या उठल्या घरच्या सर्वांना त्याच्या पध्दतीने गुड
मार्निंग करणारा, लाड करवून घेणारा अलेक्झांडर दोन दिवसांपासून एकदम
शांत होता. या खोलितून त्या खोलित अस्वस्थपणे फेऱ्या मारायचा. मध्येच खिन्न होऊन
कोपऱ्यात जाऊन बसायचा. घरच्यांसोबत दंगामस्ती नाही, लुडबूड
नाही, खाण्यापिण्यासाठी आग्रही नाही. तेजोमयी आणि बाबांच्या
ते लक्षात आलं होतं. आई मात्र काही बोलली नाही.
बाबा, याला बरं नसेल का हो…तेजोमयीनं
विचारलं..
काय होणार ठोंब्याला. खातो पितो नि
झोपतो, सुखाचा जीव..आपण उगीच काळजी करतो..बाबा बोलण्याच्या आधीच आईने प्रतिक्रिया दिली.
अगं,तसं नसेल, इतका खिन्न असतो का कधी…काहीतरी नक्कीच बिनसलं असणार याचं, तेजोमयी म्हणाली..
बरं बाबा, करा
त्याचे लाड आणि कौतुक, असं बोलून आई तिच्या कामामध्ये
व्यस्त झाली. बाबा आणि तेजोयमी अलेक्झांडरजवळ बसले. दोघांनी त्याच्या अंगावरुन
प्रेमाने हात फिरवला. अलेक्झांडरने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. डोळे मिटून तसाच
पडून राहिला..
डॉक्टरकडे न्यायचं का हो बाबा यास …तेजोमयीनं काळजीच्या सुरात बाबांना विचारलं. बाबांनाही थोडी चिंता
वाटल्यानं त्यांनी डॉगी क्लिनिकला,अलेक्झांडरला कधी आणायचं
हे मोबाइलवरुन विचारलं.
डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला आणायला सांगितलं.
त्याप्रमाणे अलेक्झांडरला डॉक्टरांकडे घेऊन गेले. त्यांनी त्याला त्यांच्या
पध्दतीनं तपासलं. अलेक्झांडरला काहीही झालं नसल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. तसं
त्यांनी बाबांना सांगितलं. मग,हा असा अस्वस्थ आणि खिन्न कां बरं हो काका, तेजोमयीनं
विचारलं. डॉक्टरांनी तेजोमयीकडे बघितलं. अर्धा मिनिटं त्यांनी डोळे मिटले.
कसल्यातरी विचारात ते गढून गेले. डोळे उघडल्यावर त्यांनी बाबांना, अलेक्झांडरचा दिनक्रम विचारला..बाबांनी सारं काही सांगितलं. त्यात
सिम्बासोबत एक तास खेळण्याचा उल्लेख येताच, डॉक्टरांनी
बाबांना विचारलं..हा सिम्बा कोण?
सिम्बा, हा
बाजूच्या वानखेडे काकांचा डॉगी.अलेक्झांडर आणि तो दोघेही एकाच वेळी त्यांच्या
त्यांच्या घरी आल्याने, लवकरच दोघांची गट्टी जमली. मग कधी
अलेक्झांडरच्या घरी सिम्बा तर कधी सिम्बा अलेक्झांडरच्या घरी दररोज दंगामस्ती करत,खेळत. तेजोमयीचे बाबा अलेक्झांडरला फिरायला नेत. कधी कधी सिम्बासुध्दा
त्यांच्यासोबत जायचा. वानखेडे काका सुध्दा सिम्बासोबत अलेक्झांडरला फिरायला घेऊन
जात. हे सगळं ऐकून घेतल्यावर डॉक्टरांनी विचारलं, हा
सिम्बा कुठाय सध्या..
घरी असावा.बाबा
म्हणाले..
या दोघांची भेट झाली नाही का,
दोन दिवसात..डॉक्टरांनी विचारलं..
खरच, दोन दिवसांपासून सिम्बा दिसलाच नाही… तेजोमयी
आठवून म्हणाली..
मग ताबडतोब घरी जावून या
दोघांची भेट घडवून आणा..आणि चमत्कार बघा.मित्राच्या विरहाने हा अस्वस्थ झालाय.. डॉक्टर म्हणाले.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार
तेजोमयी आणि बाबा, अलेक्झांडरला घेऊन घरी आले. बाबांनी
वानखेडे काकांच्या सदनिकेकडे बघितलं. दरवाजाला कुलूप होतं. वानखेडे काका- काकू
सिम्बासोबत बाहेर गेल्याचं स्पष्ट झालं. बाहेर जाताना
ते नेहमीच सांगून जात.
यावेळी त्यांनी कां बरं
सांगितलं नसावं, बाबांनी तेजोमयीस विचारलं..
बाबा तुम्ही काकांना फोन कराना..बाबांना ते पटलं..त्यांनी वानखेडे काकांना मोबाइल लावला. ते डॉगीच्या
मोठ्या दवाखान्यात होते. सिम्बॉला कावीळ झाल्यामुळे त्याला दोन दिवसांपासून
दवाखान्यात भरती करावं लागलं होतं. सिम्बावर उपचार करताना घरची मंडळी जवळ असणं
गरजेचं असल्यानं काका आणि काकू दोन दिवसांपासून तिथेच होते..
अहो, आम्हाला
नाही का सांगायचं, आम्ही मदतीला आलो असतो ना.. बाबा म्हणाले. वानखेडे काकांनी काय उत्तर दिलं ते काही तेजोमयीस कळलं
नाही….
०००
बाबांनी
फोन बंद
करताच तेजोमयी
म्हणाली, सिम्बाला
भेटायला दवाखान्यात
जाऊया.
दोघांना एकमेकांना
बघून बरं
वाटेल. बाबांना
ही कल्पना
आवडली.आजारी
सिम्बाला बघण्यासाठी
दवाखान्यात जात
असल्याचं तेजोमयीनं
आईस बाहेरुनच
सांगितलं.
दोघेही
अलेक्झांडरला घेऊन
दवाखान्यात सिम्बाचा
उपचार सुरु
असलेल्या खोलित
पोहचले. दोन
दिवसांपासून उपचार
सुरु असूनही
सिम्बा उपचारांना
प्रतिसाद देत
नव्हता. त्याच्यापोटात अन्नही गेलं
नव्हतं त्यामुळे
डॉक्टर चिंतेत
होते.. दवाखान्यातील खोलितील सिम्बाकडे
अलेक्झांडरचं लक्ष
गेलं.
त्याला
बघताच अलेक्झांडरने कु S ईं s करुन
आनंद व्यक्त
केला. तेजोमयी
आणि बाबांना
आश्चर्य वाटलं. त्याहून
आश्चर्याची गोष्ट
म्हणजे, दोन
दिवसांपासून मलूल
झालेल्या सिम्बाने
डोळे उघडले. अलेक्झांडर
दिसताच, सिम्बाने
त्याच्याकडे झेपावण्याचा प्रयत्न केला…पण
अशक्तपणामुळे त्याला
ते जमलं
नाही..तिथे
उपचारासाठी आलेल्या
डॉक्टरांच्या लक्षात
या सर्व
बाबी आल्या.
सिम्बा शंभर टक्के बरा होणार बघा..त्याचं औषध आलय आता..काळजीच मिटली..वानखेडे
काकांना डॉक्टर
म्हणाले.
तेजोमयीच्या बाबांनी मग
आपला अनुभव
डॉक्टरांना सांगितला.सिम्बाला
बघताच दोन
दिवसांपासूनची अलेक्झांडरची अस्वस्थता कशी
संपली,हे
डॉक्टरांच्या लक्षात
आणून दिलं.
अलेक्झांडर, इथे काही दिवस राहिला तर सिम्बा लवकरात लवकर बरा होईल..दोघांची मैत्री घट्ट आहे. एकमेकांना बघून त्यांना होणारा आनंद आमचे उपचार अधिक अधिक प्रभावी करतील. तेव्हा ठेवाल ना याला इथे,
डॉक्टरांनी विचारलं…
ठेऊ
या की..त्यात
काय मोठसं…असं
तेजोमयीस म्हणावसं
वाटलं.पण
हे इतकं
काही इतकं
सोपं नव्हतं..कारण
कसल्यातरी कारणांवरुन
काही दिवसांपासून आई आणि
वानखेडे काकूंचं
बोलणं बंद
होतं.त्यामुळे
आईला विचारुनच
निर्णय घ्यावा
लागणार होता. तसं
तिने बाबांना
बाजूला नेऊन
सांगितलं..चांगल्या
कामासाठी आई
नाही म्हणणार
नाही याची
त्यांना खात्री
होती. त्यांनी
आईस फोन
लावला.आतापर्यंत
काय काय
घडलं ते
सांगितलं. आई
एका क्षणात
कोणतेही आढेवेढे
न घेता
तयार झाली.
मी
सुध्दा दवाखान्यात
येते, तोपर्यंत
तिथेच थांबा
असा निरोपही
दिला. तसे
बाबांनी वानखेडे
काका-काकूंना
सांगितलं. दोघांनाही
बरं वाटलं. एका
तासात आई
दवाखान्यात पोहचली. सोबत
तिने काका
कांकूसाठी डबा
आणला. अलेक्झांडरचाही डबा आणला. वानखेडे
काकुंच्या डोळयातून
अश्रू ओघळले.
काकूंचा
हातात हात
घेऊन आई
म्हणाली..अहो, अशा
वेळी शेजारधर्म
पाळायचा नाही
तर कधी. हे
मुके जीव
आपली लेकर
आहेत..त्यांच्याठी इतकही नाही
करायचं का..काकांना
गहिवरुन आलं. त्या
रात्री काकांच्या
मदतीला बाबा
दवाखान्यात थांबले. काकूंना
घेऊन आई
घरी परतली.
अलेक्झांडर
डोळयासमोर दिसत
असल्याने सिम्बा
उपचारांना शहाण्याबाळासारखा प्रतिसाद देऊ
लागला. फार
त्रास न
देता इंजेक्शन
घेऊ लागला. दुसऱ्या
दिवशी सकाळी
आई आणि
काकू दवाखान्यात
आल्या. त्यांनी
बाबा आणि
काकांना सुटी
दिली.असे
तीन चार
दिवस गेले. सिम्बा
पूर्ण बरा
झाला. काकांनी
डॉक्टरांचे आभार
मानले.
आमचे
आभार मानण्याच्या ऐवजी अलेक्झांडरचे माना..तो
आला नि
सारं चित्र
बदललं..थँक्यू
अलेक्झांडर. त्याच्या
पाठिवर प्रेमाने
हात फिरवत
डॉक्टर म्हणाले.सिम्बाला
दवाखान्यातून सुटी
मिळाली. त्याच्या
आजारपणामुळे आई
आणि काकूंचं
भांडण मिटलं. तेजोमयीस
आईचा अभिमान
वाटला..घरी
येत असताना
तिने आईची
पप्पी घेतली..अलेक्झांडरही आईच्या कुशीत
शिरला.
सुरेश वांदिले
Comments
Post a Comment