आईचा स्पर्ष
आईचा स्पर्ष
तेजोमयी तिच्या आईबाबांसमवेत काही दिवसांपूर्वी
एका अभायरण्यात मुक्कामास गेली होती. या ठिकाणचे वनाधिकारी देशपांडे बाबांचे मित्र
होते. बऱ्याच दिवसांपासून ते बाबांना अभयारण्य पाहण्यासाठी बोलवत होते. पण या ना
त्या कारणांमुळे बाबांचं काही जाणं झालं नव्हतं. मात्र गेल्या आठवड्यात त्यांनी
वेळ काढला आणि ते तिघेही अभयारण्यात आले. देशपांडे काकांना फार आनंद झाला.
देशपांडे कांकाचा बंगला वनातच होता. बंगल्याच्या
अवतीभवती ऐसपैस जागा होती. त्या ठिकाणी चारज्-पाच पिंजरे ठेवले होते. त्यातल्या
एका पिंजऱ्याकडे तेजोमयीचं लक्ष गेलं. तिथे दोन पिल्लं दंगामस्ती करत होती. दुरुन
तरी ती पिल्लं मांजरीची वाटली. त्यांची दंगामस्ती बघून तेजोमयीस मजा आल्याने ती
तिकडे धावली. देशपांडे काकाही तिच्या मागोमाग गेले. खेळण्यात रंगून गेलेली ती
पिल्लं मांजरीचं नसल्याचं तेजोमयीच्या लक्षात आलं.
मग कुणाची असतील बरं ही पिल्लं, तिच्या मनात आलं.
वाघाची तर नसतील ना..असं तिला वाटलं नि घाबरुन ती पिंजऱ्याच्या मागे आली. देशपांडे
काका तिची ही गंमत बघत होते..
अगं तू घाबरतेस कशाला..ती पिल्लं काही तुला
चावणार नाहीत..
तसं नाही हो काका..ही पिल्लं वाघोबाची असावित असं
मला वाटलं..
म्हणून तू घाबरलीस होय..काका हसत म्हणाले..
तसं नाही पण..तेजोमयी त प प करु लागली..
अगं बाळ, ही पिल्लं वाघाची नसून बिबट्याची आहे. पण
ती वाघाची असती तरी त्यांनी काही केलं नसतं..दहा पंधरा दिवसांची बाळं आहेत दोघेही ..देशपांडे
काकांनी तिला समजावलं...
मग, यांची
आई गेली कुठे हो काका..
तेच तर ठाऊक नाही..या बाळांना जन्म देऊन ती
कुठेतरी निघून गेली..एक दिवस अशीच पडून होती जंगलात ही पिल्लं . गस्तीवर असणाऱ्या
आमच्या पथकाला ती सापडली. त्यांनी इथे आणून ठेवली..
आईसाठी रडली नाही का हा ही पिल्लं.. ..
ते तर सगळीच बाळं करतात..त्याला ही पिल्लं काही
अपवाद नाहीत. मात्र मीच यांचा आई झालो. त्यांना दूध पाजलं..आंघोळ करुन
दिली..त्यांना थंडी वाजून नये म्हणून पिंजऱ्यात चादर टाकली. झोपल्यावर पांघरुन
टाकलं....फक्त चघळू शकतील अशी खेळणी दिली..त्यांच्याशी मी सुध्दा अधून मधून खेळतो..आता
मला ती चांगली ओळखतात..बघ मी आल्याबरोबर कसा आनंद झालाय त्यांना..देशपांडे काका
तेजोमयीस म्हणाले..
ते अगदी खरं होतं. खेळता खेळता जेव्हा दोघांचही
लक्ष देशपांडे काकांकडे गेलं तेव्हा ते पिंजऱ्याकडे धावले. पिंजऱ्याच्या कड्यांना
धरुन उभे राहून देशपांडे काकांकडे एकटक बघू लागले. लगेच खाली उतरून त्या दोघांनी स्वत:भोवती
गिरकी मारली. एकमेंकावर उड्या मारुन आपला आनंद व्यक्त केला. पिंजऱ्याचे दार उघडून देशपांडे
काका आत गेले. दोन्ही पिल्लं त्यांच्या अंगावर चढून त्यांच्याशी खेळू लागली.
दुपारच्या त्यांच्या भोजनाची वेळ झाली असल्याने, वनकर्मचाऱ्यांने
त्या दोघांसाठी आणलेले बोनलेस चिकनचे भोजन देशपांडे काकांनी काळजीपूर्वक त्यांना
भरवले. दोघांनीही मिटक्या मारत आणि उड्या मारत त्याचाद आस्वाद घेतला. त्यांचं भोजन
झाल्यावर त्यांनी पिंजऱ्यात एके ठिकाणी असलेलं पाणी पिलं. पिंजऱ्याच्या बाहेर पडण्यापूर्वी
काकांनी दोघांना थोपटून ते बाहेर पडले. दोघेही पुन्हा खेळण्यात मग्न झाले...
०००
या दोघांना त्यांच्या आईची आठवण येत नसेल का, हा
प्रश्न तेजोमयीच्या मनातून जाईना..
काकांनी तिला या प्रश्नाचं ठराविक ठोकळेबाज उत्तर
दिलं होतं..
जेवतानासुध्दा तिचं लक्षं पिंजऱ्याकडेच जात
होतं...आईबाबांनी तिला जेवताना इकडचा तिकडचा विचार करु नयं असं समजावून सांगितलं. ती
तेव्हढ्यापुरती हो म्हणाली.. तेजोमयीची अस्वस्थता काकांच्या लक्षात आली..
दुपारच्या जेवणानंतर थोडावेळ विश्रांती करुन तेजोमयी
आणि आईबाबा, देशपांडे काकांच्या गाडितून वनभ्रमंतीला निघाले. तीनचार तास फिरुन
संध्याकाळी ते परत आले.
आईबाबा वऱ्हांड्यातील खुर्च्यांवर बसले. खानसाम्याने
त्यांना चहा आणून दिला. त्यांचं चहापान सुरु असताना देशपांडे काका पिंजऱ्याकडे
गेले. तेजोमयीही त्यांच्या पाठिमागे गेली.
त्या पिल्लांना आईची आठवण येत नसेल का, हा प्रश्न
पुन्हा तिच्या मनात आला..
आता काका काय करतात हे बघण्याची तिला उत्सुकता
लागून गेली. जवळपास अंधार पडायला सुरुवात झाली होती. वनकर्मचाऱ्यांनी रात्रीचे
जेवण दोन्ही पिल्लांना भरवले. देशपांडे काका पिंजऱ्याच्या बाहेरुनच त्या दोघांवर
लक्ष ठेऊन होते.
इतक्या लकवर जेवतात ही पिल्लं..तेजोमयीनं
विचारलं..
अगं दिवसभर ही पिल्ल खेळतात, दंगामस्ती करतात. त्याने
थकून जातात. त्यामुळे ते लवकर झोपी जातात, म्हणून त्यांना लवकर भरवावं लागतं..
ते आता झोपी जातील का काका....
हो हो पण तू जरा बघतच राहा आता ते काय करतात
ते..काका तिला म्हणाले.
त्या दोघांचं भोजन आटोपलं. त्यांनी पाणी पिलं. पिंजऱ्यात
इकडे तिकडे चार दोन फेऱ्या मारल्या. आणि नंतर एकमेकांना घट्ट मिठी मारली. काही
क्षण ते दोघेही त्या अवस्थेत होते. त्यानंतर दोघांची मिठी सैल झाली.ते खाली बसले
आणि त्यांनी अंग खाली झोकून दिले. पुढच्या काही क्षणात दोघेही गाढ झोपी गेले...
००००
बघितलंस ना तेजो..
हो काका, पण त्या दोघांनी एकमेकांना मिठी कां
मारली..तेजोमयीनं विचारलं..
अगं दररोज ते रात्री झोपण्यापूर्वी अशीच मिठी
मारतात नि मगच झोपी जातात...
त्यांना कुणी शिकवलं का ते..तेजोमयीनं विचारलं..
नाही गं..तू मघा विचारलस ना त्यांना त्यांच्या
आईची आठवण येत नसेल का म्हणून..
मग..
येतच असणार..बिचारे चिमुकले जीव..बोलू शकत नाहीत..भावना व्यक्त करु
शकत नाहीत..मग त्यांनीच एकमेकांना सांत्वना देण्याचा हा मार्ग शोधला असावा..एकमेकाच्या
मिठीत ते आईचा स्पर्श आणि माया अनुभवत असले पाहिजे..त्यांची आई हरवली असली तरी
त्यांनी मात्र आपल्या परस्परांच्या स्पर्शातून आईस हरवू दिलं नाही..काका म्हणाले. बोलता
बोलता त्यांना गहिवरुन आलं....
सुरेश वांदिले
Comments
Post a Comment