नेताजी जिवंत आहेत...
नेताजी जिवंत आहेत...
तेजोमयीच्या घरी आज बऱ्याच दिवसांनी बाबांचे काही
मित्र आले होते. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर, त्यांची चर्चा नेताजी सुभाषचंद्र
बोस यांच्याकडे वळली.
प्रत्येक जण नेताजींबद्दल भरभरुन बोलत होता. काका
मंडळींना पाणी दे, चहा-बिस्किटं दे, ही कामं तेजोमयीच करत असल्याने ही चर्चा तेजामयीच्या
कानावर पडत होती. आपण बैठकीच्या खोलित बसलो तर चालेल काय? असं तिने बाबांना भीत भीत विचारलं. मोठ्यांच्या गप्पांमध्ये
त्यांच्या परवानगीशिवाय सामील व्हायचं नाही, असं अनेकदा आईनं तिला सांगितलं होतं.
अगं, तू अशी घाबरून कां विचारतेस, देसाई काकांनी
तिला विचारलं.
ज्यांच्यावर आम्ही आता बोलतोय ना ते नेताजी कशाला
सुध्दा घाबरायचे नाहीत..बलाढय ब्रिटिश राज्यकर्तेच त्यांना घाबरायला लागले होते...रायकर
काका म्हणाले..
तसं नाही हो..पण विचारुन घेतलेलं बर...तेजोमयी रायकर
काकांकडे बघत म्हणाली. बाबा हसले आणि तेजोमयीस आपल्या बाजूला बसण्यास सांगितलं.
बाबा आणि मित्रांच्या चर्चेची गाडी पुन्हा नेताजींकडे
वळली. नेताजींची प्रखर बुध्दीमत्ता, त्यांचे शौर्य, त्यांची धडाडी, मातृभूमिवरचं
त्याचं अलोट प्रेम, देशाच्या स्वातंत्र्यासाठी कोणताही त्याग करण्याची त्यांची तयारी,
अखंड परिश्रम करण्याची वृत्ती, अशा कितीतरी गुणांवर काकामंडळी एकमेकांना सांगू लागली.
सांगता सांगता मोहिते काका म्हणाले,
नेताजी आज जिवंत असते तर देशाची परिस्थिती वेगळी
राहिली असती..दुर्दव्याने त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला..
अरे, तो अपघात नव्हता..तो घात होता.. नेताजींना
ठार करण्यासाठी केलेला कट होता..
पण तो अपघातच होता असं कागदापत्री सिध्द झालय
ना..बाबांनी मुद्दा मांडला..
तसं सिध्द करायला काय जातं.. भोसले काका म्हणाले.
पण मी असं बरेचदा वाचलय की त्या अपघातातून नेताजी
वाचले आणि ते आजही जिवंत आहेत..चौधरी काका म्हणाले.
मी सुध्दा असचं कुठे कुठे वाचलय..बाबांनी माहिती
दिली.
ते नक्कीच जिवंत असले पाहिजे..ते जेव्हा प्रगटतील
तेव्हा विमान अपघाताचे रहस्य उघड होईल..भोसले काका म्हणाले.
काका मी बोलू का..तेजोमयीने भोसले काकांना
विचारलं..
वा वा कां नाही, तुला नेताजींचा ठावठिकाणा ठाऊकाय
का? भोसले काका स्मित करत बोलून गेले.
त्यावर सर्वजण हसले. त्यामुळे तेजोमयी हिरमुसली. ते
तिच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसत होतं. भोसले काकांनी तिला जवळ बोलावलं आणि म्हणाले
अगं मी विनोद केला. थोडीशी गंमत आपली..तुला वाईट वाटलं असेल क्षमा कर हं बाळ..
बरं ते जाऊ दे...तुला काय सांगायचं होतं..बाबांनी
तेजोमयीस विचारलं. बाबांकडे जात तेजोमयी म्हणाली...
आज जर नेताजी जिवंत असते तर किती वर्षाचे राहिले
असते बाबा..
१२५...बाबांनी उत्तर दिलं..
आपल्याकडे फार कमी व्यक्ती १०० वर्षे जगतात. १२५
वर्षे तर बोटावर मोजण्याइतकेच...तेजोमयी म्हणाली.
तुला काय म्हणायच बाळ..रायकर काकांनी विचारलं..
अहो काका, आता नेताजी जिवंत असतील आणि कधीतरी
प्रगटतील असं म्हणणं या शास्त्रीय तथ्याला धरुन नाही ना..
तू म्हणतेस ते बरोबर आहे बाळ..बाबांनी तिला
दुजोरा दिला. इतर काकांचीही तशीच प्रतिकिया होती.
नेताजी जिवंत आहेत की मृत्यू पावले या चर्चेत आता
तसा काहीच अर्थ नाही. उगाचच आपण त्यावर आपली उर्जा खर्च करत असतो. असं सर्व काकांचं
एकमत झालं..
थँक्यू.. मोहिते काका तेजोमयीस म्हणाले..
पण काका, नेताजी जिवंत आहेत हे मला ठाऊकाय. शिवाय
ते कधीच मृत्यूमुखी पडणार नाही हेही मला ठाउुकाय...तेजोमयी म्हणाली.
आँ..काहीतरीच काय बाळ..हे तर शास्त्रीय तथ्याच्या
विरोधत नाही का गं..रायकर काका आश्चर्य व्यक्त करत म्हणाले..
काका, तुम्ही थोड्याच वेळापूर्वी नेताजींची थोरवी,
त्यांचं साहस, मातृभूमिविषयी अलोट प्रेम, स्वातंत्र्य प्राप्तिसाठी सर्वस्व त्याग
करण्याची तयारी याबद्दल सांगितलत ना..इतर काकांनी त्यांचे दुसरे गुण वर्णन केले....या
रुपाने ते आपल्या अवतीभवतीच नाहीत का...आज जसे ते आहेत तसेच त्यांच्या दोनशेव्या
वाढदिवासाच्या दिवशी राहतील..बरोबर ना..
अगदी बरोबर बाळ..काय छान मुद्दा मांडलास गं तू..भोसले
काकांनी तिचं मनसोक्त कौतुक केलं. तेजोमयीस खूप बरं वाटलं.
नेताजींच्या मृत्यूच्या रहस्याचा शोध घेण्याऐवजी त्यांच्या
उदात्त विचारांना अधिकाधिक लोकांपर्यंत नेण्याचा आणि ते लोकांनी अंगिकारावे म्हणून
प्रयत्न करण्याचा तिने मनोमन निर्धार केला...काका मंडळी निघून गेल्यावर तसे तिने
आईबाबांना बोलून दाखवले. दोघांनीही कौतुकाने तिची पाठ थोपटली..
सुरेश वांदिले
Comments
Post a Comment