कोल्हा फसला..
एकदा, एका बिळात राहणाऱ्या सशाकडे कोल्ह्याचे
लक्ष गेले. हा आपल्या तावडीत सापडला तर त्याच्या मऊ मऊ मासावर मस्त मेजवाणी झोडता
येईल, असे कोल्ह्यास वाटले. आता ससा कधी बिळाच्या बाहेर पडतो, याची तो बराच वेळ
वाट बघत बसला.
अधूनमधून तो बिळाच्या समोर येराझा-या मारायचा. त्याची
सावली बिळात पडायची. ते बघून सशाने हळूच मान बाहेर काढून बघितले. कोल्ह्याला बघून
त्याची गाळण उडाली. आता आपले काही खरे नसल्याची त्याने खूणगाठ बांधली.
मात्र, असे घाबरुन चालणार कसे ना..त्याने
स्वत:लाच प्रश्न केला. फेऱ्या मारुन मारुन कोल्हा थकून झोपला की आपण बिळातून बाहेर
पडून धूम ठोकायची असं त्याने मनात ठरवलं.
कोल्ह्याचे, बिळापुढे फेऱ्या मारणे चालूच होतं. ससा
आता बाहेर पडेल,मग पडेल,तो किती वेळ असा दडून बसेल असं कोल्ह्यास वाटत होते. कोल्ह्याचे
हे वाटणे खरेही होते. कारण खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यासाठी सशाला बाहेर पडणे
भागच होते.
फेऱ्या घालून घालून कोल्हा खरोखरच थकला. त्याचे
पायही खूप दुखू लागले. आता त्याच्याच्याने चालवेना. तो मटदिशी खाली बसला. त्याच्या
डोळ्यासमोर ग्लानी आली. हे सर्व ससा बिळातून बघत होता. आता थोडी हिंमत दाखवली तर
आपली सुटका होऊ शकते,असे सशास वाटले.
मात्र या साहसात धोकाही होता.थकलेल्या अवस्थेतही कोल्ह्याने
आपल्यावर हल्ला केला,तर आपण त्याच्या तावडीतून सुटणार नाही, हे सशाला पक्के ठाऊक
होते. बाहेर पडावे की पडू नये, असा त्याच्या मनात बराच वेळ गोंधळ सुरु होता. कोल्हा
जर इथेच राहिला,तर तसेही बिळात आपण मरुन जाउु असा विचार सशाने केला. थोडी हिंम्मत
दाखवली, तर कदाचित आपली सुटकाही होऊ शकेल.आणखी हिम्मत दाखवली तर या दुष्ट
कोल्ह्यास अद्दलही घडवता येईल असे सशाला वाटले. तो धिर धरुन बिळातून हळूच बाहेर
पडला आणि कोल्ह्यासमोर उभा राहिला..
त्या गलितगात्र अवस्थेत कोल्ह्याला हे बघून फार
आश्चर्य वाटले..
तो काही बोलण्याच्या आतच ससाच,त्याला म्हणाला,अरे
कोल्होबा दादा असा किती दिवस तू माझ्या बिळासमोर फेऱ्या मारत बसणार. मी एकटा किती
दिवस पुरणार..पण मी तुला आमच्या सशांच्या राज्यात घेऊन जातो.तिथे तुला दररोज
लुसलुशित सशांची मेजवाणी मिळेल.
हे ऐकून कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटले.
त्याने अधिरतेने विचारलं. कुठे आहे रे सशांचे
राज्य..
तुला माझ्यासोबत चलावे लागेल..
आत्ता..नकोरे बाबा. मी, तुझ्या बिळापुढे चालून
चालून थकून गेलो आहे. माझ्याच्याने एकही पाउुल पुढे टाकवत नाही..उद्या सकाळी गेलो
तर नाही का चालणार..
अजिबात नाही कोल्हेदादा, रात्री तुला गुपचूप हे
राज्य दाखवतो, मग सकाळी नव्या दमाने तू तिथे जा...सकाळी गेलो, तर लांडगेदादा,अस्वलदादा
यांना नाही का संशय येणार?
त्यांना कशाला भागीदार होऊ द्यायचे या मेजवाणित. ससा म्हणाला.
कोल्ह्यास सशाचे म्हणणे पटले. पायात त्राण नसतानाही तो सशासोबत,सशांच्या
राज्यात जाण्यासाठी तयार झाला. ससा पुढे आणि कोल्होबा मागे..असे खूप अंतर दोघांनी
कापले.आता तर कोल्ह्यास श्वास घेणेही जड जात होते.
त्याने पुढे जाण्यास नकार दिला..
अरे दादा, बस एक पाऊल पुढे टाक. म्हणजे थेट तू
सशांच्या राज्यातच पोहचशील. सशा त्याला समजावले.
नक्की ना..
हो हो
नक्की..मला खोटं बोलायचं असतं तर मी तुझ्यासमोर तरी उभा राहिलो असतो का दादा..ससा
म्हणाला..
शक्य नसतानाही कोल्ह्याने एक पाऊल पुढे टाकले आणि
तो खोल दरित जाऊन पडला...
सशांच्या राज्याची कथा रंगवत रंगवत,या सशाने कोल्ह्याला
दरीपर्यंत आणले होते. दररोज मिळू शकणाऱ्या सशाच्या मेजवाणीचे चित्र रंगवत ते काही
कोल्ह्याच्या लक्षात आले नाही. आणि लोभापायी तो प्राण गमावून बसला.
कोल्हा दरित पडल्यावर सशाच्या जीवात जीव आला. त्याने डोळे मिटले. मोठा
श्वास घेतला आणि त्याने आपल्या बिळाकडे धूम ठोकली...
Comments
Post a Comment