आई रागावते तेव्हा...
आई रागावते तेव्हा...
वाघीणकाकूस आपल्या दोन्ही बाळांचा फार अभिमान
होता. त्यातले कुमार वाघोबा हे चपळ होते. वाघीण काकुंची मुलगी सुस्त होती. पण
हळूहळू तीसुध्दा आपल्या सारखी शूर आणि कोणत्याही संकटाला न भिणारी होईल याची
खात्री काकुंना होती. ती दररोज दोघांना, जंगलात कसं वागायचं? कसं फिरायचं? शिकार कशी करायची? संकटाची चाहूल कशी ओळखायची?
संकटं आलं तरी न घाबरता स्वत:ची सुटका कशी करुन घ्यायची? इतर प्राण्यांवर कसा वचक ठेवायचा? अशा कित्येक
गोष्टी समजावून सांगायची.
कुमार वाघोबांना या गोष्टी भराभर जमू लागल्या. पण
काकुंची मुलगी मात्र मागे पडू लागली. कधी प्रेमाने तर कधी रागावून वाघीण काकू तिला
धडे द्यायची. आई आणि दादा असताना आपणास कुणाची भीती कां वाटावी? असं या मुलीला वाटायचं. कुमार
वाघोबाची प्रगती होत असताना, मुलीचं अडखळणं सुरुच होतं.त्यामुळे काकुंना काळजीच
वाटू लागली.
एकदा, कुमार वाघोबा आणि काकूंची मुलगी जरा
निवांत झोपले होते. ते दोघे सुरक्षित आहेत असं बघून काकू शिकारीसाठी बाहेर पडल्या.
त्यावेळी तिथे दुसऱ्या क्षेत्रातला वाघोबा कसा कोण जाणे तिकडे आला. कुमार वाघोबा
आणि काकूंच्या झोपलेल्या मुलीकडे बघून त्याने गुरगुरणं सुरु केलं. ते दोघेही जागे
झाले. आपल्या समोर अनोळखी वाघोबा बघून दोघेही घाबरले. मुलगी अधिकच घाबरली. ती
कुमार वाघोबाच्या पाठिमागे दडू लागली.
वाघोबाने मोठी डरकाळी फोडली. त्यामुळे दोघेही
थरथर कापू लागले. ही नवी डरकाळी ऐकून वाघीण काकू सावध झाल्या. आपल्याच क्षेत्रातून
ही डरकाळी आल्याचे त्यांनी बरोबर हेरलं. त्या तडक माघारी वळल्या नि वेगाने कुमार
वाघोबा आणि मुलगी असलेल्या क्षेत्राकडे सुसाट निघाल्या. काही क्षणात त्या वाघोबांच्या
समोर उभ्या ठाकल्या. त्याच्याकडे बघून त्यांनी मोठी डरकाळी फोडली.
आईला बघून कुमार वाघोबा सावरले. ते आईच्या
बाजूला जाऊन त्यांनीही डरकाळी फोडली. मात्र मुलगी गर्भगळीत झाली होती. त्यामुळे
तिला डरकाळीच फोडता आली नाही. ती अधिकच थरथर कापू लागली.
इकडे वाघीण काकू आणि त्यांचा कुमार हे दोघे एका बाजूला
आणि वाघोबा एका बाजुला असा डरकाळ्यांचा सामना चांगलाच रंगला. एकमेकांच्या शक्तीचा
अदमास घेत, दोघेही हल्ला करायचा, नाही करायचा हे बघत होते. मात्र आपण या दोघांपुढे
कमी पडू, आपली डाळ शिजणार नाही, हे कदाचित लक्षात आल्याने वाघोबा काही वेळाने
निघून गेले.
ते जाताच,मुलीच्या जिवात जीव आला.ती धावतच आईकडे
आली. तिने तिला मिठी मारली. पण आईने जिभ चाटून तिला अजिबात दिलासा दिला नाही. तिला
हलकेच बाजूला करुन कुमार वाघोबास जवळ घेतले. त्याच्यावर ती प्रेमाचा वर्षाव करु
लागली. आई रागावल्याचं मुलीच्या लक्षात आलं. तिच्या डोळयातून अश्रू वाहू लागले.
पण वाघीण काकुंनी तिकडे अजिबात लक्ष दिले नाही.
आपल्या जगात भित्र्यांना स्थान नाही, असं आई कुमार वाघोबाकडे बघत म्हणाली.
मुलीने खूप विनवणी केली. पण काकूंनी तिचे ऐकलं
नाही. कुमार वाघोबांनी तिला समजवायचा प्रयत्न केला तर आई त्यालाच रागावली.
मी निघून जाईन दोघांनांही सोडून, असं तिने
सांगितलं. मला शिक्षा कर पण रागावू नकोस, असं पुन्हा पुन्हा मुलगी सांगत होती.
त्यावर आई म्हणाली, या झाडावर चढ आणि खाली
पाण्यात उडी मार. ही तुझी शिक्षा!
ती,त त प करायला लागली.पण
तिच्यापुढे नाईलाज होता. झाडावर कसं चढायचं हे आईने शिकवलेलं आठवून आठवून ती वर
चढली. पाण्यात उडी मारणार तोच तिला भोवळ आल्याने ती पाण्यात पडली. पडत असताना ति
वाटलं संपलं सारं पण तसं काही झालं नव्हतं. ती अलगद पाण्यात पडली. लगेच सावरली. आपण
समजतो तितकं काही शिकणं कठीण नाही, हे तिच्या लक्षात आलं. कंटाळा करण्यापेक्षा, मागे
मागे राहण्यापेक्षा आई जे सांगतं तसं केलं तर आपण बहादूर बनू आणि आईच्या गळयातील
ताईतही होऊ हे तिला पटलं. तिने पाण्यात उभे राहून डरकाळी फोडली. ते बघून आईने आणि दादाने
तिच्याकडे बघितले. आईला आंनद झाला. तिच्याकडे धावली आणि तिने तिला मिठित घेतले. आईचा
राग कुठल्या कुठे पळून गेला.
सुरेश वांदिले

Comments
Post a Comment