बाळाचा चांदोबा...
बाळाचा चांदोबा...
बाळास चांदोबा फार
आवडतो. संध्याकाळी
किंवा रात्री तो आभाळात दिसायला लागला की बाळाची कळी खुलते. गॅलरीतल्या खिडकीत
जाऊन तो न्याहळत बसतो. चांदोबाकडे बघत बघत छान जेवणही करतो. कधी कधी चांदोबाच्या
समोरुन ढग जातात. त्यावेळी चांदोबाचं दर्शन होत नाही. अशावेळी बाळ जेवत असेल
तर, तो रडायला
लागतो. त्याला
समजावयाचं कसं हा प्रश्न प्रत्येक वेळी आई-बाबांना पडतो. मग जे सुचेल ते कारण
बाळास सांगतात.
आज असचं छान निरभ्र
आकाश होतं. चांदोबा पूर्णपणे उगवल्याने गॅलरीतून पूर्णपणे दिसू लागला. त्याला बघून
बाळाचा आनंद व्दिगुणित झाला. त्याला मनासारखं भरवायची ही संधी आई कशी सोडणार?. आई, त्याच्यासाठी खायला
घेऊन आली.त्याला पहिला घास भरवला. दुसरा घास भरवला. तिसरा घास भरवणार तोच आकाशात
ढगांची अचानक गर्दी झाली. चांदोबा ढगाआड अदृष्य झाला. चांदोबाचं दर्शन होत
नसल्यानं बाळ रडायला लागलं. त्याचं रडणं काही थांबेना. त्याने घास गिळायलाही नकार
दिला..
आता काय बरं करायचं,
आईपुढे प्रश्न निर्माण झाला. चांदोबा अद्ष्य होण्याची अनेक कारणं आईने आतापावेतो
सांगितलं होती. आताशा ही कारणं काही बाळास पटत नसे. त्यामुळे त्याचं समाधान होत
नसे. त्यामुळे आता कोणतं कारण सांगावं हे याचा विचार ती करु लागली.
तिला एक कारण सुचलं
,ती बाळास म्हणाली,अरे राज्या, ढगांनी चांदोबास गिळलं,म्हणून तो दिसत नाहीय.
आईचा संवाद ऐकत
असणारा बाळाचा आठ वर्षाचा दादा आईस म्हणाला..
अगं आई, खरोखरच
ढगाने चांदोबास गिळले का?
अचानक आलेल्या या
प्रश्नाने आई जरा चमकलीच.
दादा,अरे असं असू
शकतं ना..
अगं, पण आई
गिळण्यासाठी तर तोंड हवं. या ढगांना तर तोंडच नाही. दादाने विचारलं.
आता आईची विकेट
गेली. तोंडाशिवाय गिळायचं कसं? हा दादाचा सवाल बिनतोड होता. दादा काहीतरी आपल्या
बाजूने बोलतोय हे लक्षात आल्यानं बाळाने रडणं थांबवलं होतं. दादाने प्रश्न
विचारल्यावर तो टाळ्या वाजवू लागला. दादाच्या प्रश्नाचं
उत्तर देणं तर गरजेचं होतं. आई विचार करु लागली.
अरे, आता जो ढग
दिसतोय त्याला जरी तोंड नसलं तरी चांदोबाला गिळणाऱ्या ढगास ते होतं. चांदोबास त्याने
गिळलं आणि तो या बिनतोंडाच्या ढगाच्या पाठिमागे जाऊन लपलाय.
कां लपला? त्याने तर मोठी बहादुरकीच केली ना चांदोबास गिळून.. मग त्याला कुणाची
भीती..तिथेच घुटमळत असणाऱ्या बाळाच्या तेरा वर्षाच्या ताईनं आईला विचारलं. आता
मात्र आई रडकुंडीस आली. तिचा सयंमही ढळू लागला. स्वत:ला कसं बसं शांत ठेवत आई
म्हणाली,
तायडे,तू कशाला नाक
खुपसतेस यामध्ये..तुझं तू काम कर ना..
अगं मी माझंच काम
करतय मम्मी,ताई म्हणाली..
मला तोंडघशी
पाडण्याचं काम..आई किंचित रागावत म्हणाली.
नाही गं
आई..चंद्रांला ढगाने गिळलं, असं खोटं कां सांगतेस तू बाळास..
अगं पण, त्याचं रडणं
थांबत नाही ना..
त्यासाठी खोटं कां
बोलायचं.एक खोटं बोललीस म्हणून दुसरं खोटं सांगावं लागलं.नंतर तिसऱ्या खोट्याला
शोधून काढलं..
अगं शहाणे..आता आईचा
पारा चढला होता..पुढचा अनर्थ टाळण्यासाठी बाबांनी हस्तक्षेप केला. आईला दीर्घ
श्वास घ्यायला लावला.सोडायला लावला. आईला बरं वाटलं.
तोपर्यंत ढग
दुसरीकडे निघून गेले होते.त्यामुळे चांदोबा पुन्हा दिसू लागला..
जादू..जादू..बाळ
ओरडला..ढगाच्या तोंडातून खरच सुटला करुन घेतली की या चंद्राने, दादा बोलून गेला.
ताईने कप्पाळावर हात
मारुन घेतला.आई आणि बाबांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. यापुढे शक्यतो,जे आहे तसचं
बाळास सांगायचं असं त्यांनी ठरवून टाकलं.
सुरेश वांदिले
Comments
Post a Comment