एक ना धड ..

 


एक ना धड ..

   गॅदरिंग आलं नि तेजोमयीच्या ग्रुपमध्ये उत्साह संचारला. हा ग्रुप नेहमी सांस्कृतिक कार्यकक्रमात सहभागी होण्यात आघाडीवर असायचा. या ग्रुपने एक नृत्य आणि एक नाटक बसवण्याचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे जमवाजमव झाली. मग तालमी सुरु झाल्या.

    या ग्रुपमध्ये असलेली कल्याणी पहिल्या दोन दिवसानंतर तालमीला चाट मारु लागली. तालमिला आली तरी तिचं लक्ष दुसरीकडेच असायचं. तेजोमयीनं तिला सांगून पाहिलं. पण कल्याणीनं हसण्यावरी नेलं. हिच्या मुळे आपल्या कार्यक्रमावर परिणाम होऊ शकतो हे ओळखून तेजोमयीनं वर्गशिक्षिकेला सांगितलं. त्यांनी कल्याणीला बोलावून घेतलं. तिच्यावर जेव्हा प्रश्नांची सरबत्ती केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की कल्याणीने आणखी पाच सहा कार्यक्रमात आपलं नाव नोंदवलं होतं.

सगळीकडे भाग घेऊन अष्टपैलूत्व सिध्द करण्याचा आग्रह तिच्या आईबाबांनी धरला होता. त्यामुळे तिने सगळीकडे नाव दिलं. पण एकाही कार्यक्रमाचा सराव तिला नीट करता येईनासा झाला होता.  वर्गशिक्षिकेने जेव्हा इतर ग्रुपकडे विचारणा केली तेव्हा तेजोमयीसारखीच तक्रार त्यांनीही केली.

वर्गशिक्षिकेने कल्याणीच्या आईबाबांना बोलावून सारं काही समजावून सांगितलं. एक ना धड भाराभर चिंध्या करुन अष्टपैलूत्व सिध्द होत नाही. एक दोन कार्यक्रमात उत्तम कामगिरी करणंच चांगलं असतं. ते साऱ्यांच्या लक्षात राहतं. नाहीतर हसं होतं. वर्गशिक्षिकेचं सांगणं कल्याणीच्या आईबाबांना पटलं.त्यांनी तिला तेजोमयीच्या ग्रुपच्या  कार्यक्रमाच्या तालिमला जा असं सांगितलं.

सुरेश वांदिले

0000

 

Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!